मुंबई - कोणताही चित्रपट आणि अमरीश पुरी यांच्याशिवाय 'विलन' शब्द परिपूर्ण होऊ शकत नाही. खरंतर 'हिरो'ची ओळख निर्माण करण्यासाठी सिनेसृष्टीत आलेले अमरीश पुरी पुढे असे विलन बनले ज्यांची जागा आजही कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकापेक्षा एक सरस विलन साकारला आहे. हा विलन दरवेळी चित्रपटाच्या 'हिरो'वर भारी पडत असे. त्यामुळेच अमरीश पुरी हे नाव आजही प्रेक्षकांच्या मनात रुजलेले आहे. त्यांच्या कारकिर्दीतले बरेचसे चित्रपट त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरले. त्यापेक्षाही त्यांच्या संवादांनी चित्रपटगृह दणाणून जायचे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त पाहुयात त्यांचे हे खास संवाद...
हॉलिवूडचा १९८४ साली आलेला अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपट इंडियाना जोन्स एंड द टेंपल ऑफ दूम' या चित्रपटात अमरीश पुरी यांनी 'मोला राम' ही भूमिका साकारली होती. त्यांनी पुढे याच नावाने ओळखले जायचे. पुढे १९८६ साली 'नगीना' चित्रपटातील 'भैरवनाथ' हे पात्र देखील प्रचंड गाजले. या चित्रपटातील त्यांच्या लूकचीही बरीच चर्चा झाली.
१९८७ साली 'मिस्टर इंडिया' या चित्रपटाविषयी तर काही वेगळं सांगायला नको. कारण, 'मोगँबो' म्हटलं की अमरीश पुरी यांचा चेहरा आपोआप डोळ्यासमोर येतो. हेच या चित्रपटाचं यश म्हणावं लागेल. त्यानंतर त्यांचा 'लोहा' चित्रपटातील लूकदेखील असाच हटके होता. यामध्ये त्यांनी 'शेरा सिंग'ची भूमिका साकारली होती.
अमरीश यांनी फक्त विलन म्हणूनच नाही तर त्यांनी जी भूमिका साकारली ती भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. मग, ती 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मधील 'बलवंत राय' असो किंवा मग 'परदेस'मधील भूमिका असो. त्यांच्या प्रत्येक भूमिकेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.