मुंबई -बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा लवकरच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'चेहरे' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद पंडित हे करत आहेत. हा एक सस्पेंस थ्रिलर चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे. इमरान हाश्मी पहिल्यांदाच बिग बींसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे इमरान खूप उत्साही होता. मात्र, त्यांच्यासमोर त्याची बोलती बंद होत असे. खुद्द दिग्दर्शक आनंग पंडित यांनीच याबाबत एक खुलासा केला आहे.
'चेहरे' चित्रपटात इमरान एका उद्योगपतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, बिग बी पुन्हा एकदा वकीलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. इमरानने यापूर्वी त्यांच्यासोबत भूमिका साकारली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासमोर तो सुरुवातीला नर्व्हस होत असे. मात्र, त्यांच्यासोबत आपली भूमिका उत्कृष्ट व्हावी, यासाठी इमरान सेटवर येताना चित्रपटाचे डायलॉग पाठ करुन येत असे.