मुंबई - 'मीमी' या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट बनवला असून अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेता पंकज त्रिपाठी यात मुख्य भूमिका साकारत आहेत. 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटावर आधारित 'मीमी' हा चित्रपट आहे.
'मला आई व्हायचंय' हा सरोगसीवर आधारित मराठी चित्रपट काही वर्षापूर्वी रिलीज झाला होता. थोड्याशा गंभीर वळणाचा हा चित्रपट वेगळ्या कथानकामुळे गाजला होता. आता मीमी हा चित्रपट याच विषयावर असला तरी पंकज त्रिपाठीमुळे याची रंगत वेगळी आहे. हा एक मिश्किल, मनोरंजन करणारा चित्रपट आहे. कथेमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात.
सरोगसी सारखा गंभीर विषय असलेला हा चित्रपट सुरुवातीला मजेशीर पध्दतीने मांडणी करतो आणि हळूहळू गंभीरतेकडे झुकतो. कथानकाला साजेशी गाणीही यात आहेत. ए आर रहमान यांचे संगीत खूप दिवसांनी पुन्हा या चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे.
दिनेश विजन, मॅडोक फिल्म्स आणि जिओ स्टूडिओअंतर्गत या 'मीमी' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी, एवलिन एडवर्ड्स, सई तामम्हणकर, ऐदान व्हाइटॉक, सुप्रिया पाठक, मनोज पाहवा यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. 30 जुलै रोजी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे.
हेही वाचा - आमिर खानवर भडकले 'लदाख'चे गावकरी, ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात