मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मनोरंजनसृष्टीचे रुळावर येत चाललेले वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडले आहे. तरीही अनेक निर्माते आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर करण्यावर भर देत आहेत. ‘टकटक २’ या चित्रपटाने देखील आपल्या पहिल्या शेड्युलसाठी गोवा गाठले. दोन वर्षांपूर्वा जेव्हा ‘टकाटक’ प्रदर्शित झाला, तेव्हा मराठी सिनेसृष्टीला बॉक्स ऑफिसवर हिट ठरणाऱ्या एका चित्रपटाची नितांत गरज होती. ‘टकाटक’नं ती पूर्ण केली. आता कोरोनामुळं संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये मरगळ आलेली असताना ‘टकाटक २’च्या टीमनं उत्साहवर्धक पाऊल उचलत गोव्यामध्ये शूटिंगचं पहिलं शेड्युल यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणातही काही सकारात्मक पावले सिनेसृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरत आहेत. ‘टकाटक २’ या आगामी मराठी चित्रपटानंही सकारात्मक पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीत उत्साह निर्माण करण्याचं काम केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गोव्यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गोव्यात २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत नाईट कर्फ्यू सुरू राहणार आहे. आता गोव्यातही कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच तिथले शूटिंग पूर्ण झाल्याने ‘टकाटक २’ची टीम एकप्रकारे सुदैवी ठरली आहे.
‘टकाटक २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शक मिलिंद कवडे प्रेक्षकांसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण घेऊन येत आहेत. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातील कथानकही तरूणाईवर आधारित आहे. असं असलं तरीही तरूणाईपासून थोरांपर्यंत सर्वजण ‘टकाटक २’च्या कथानकाशी एकरूप होतील. महाराष्ट्रात शूटिंगला बंदी आहे, पण गोव्यामध्ये ‘टकाटक २’चं चित्रीकरण करताना संपर्ण टीमनं योग्य ते सहकार्य केलं. कोणतीही अडचण न येता पहिलं शेड्यूल पूर्ण करू शकल्याचं समाधान मिलिंद कवडे यांनी व्यक्त केलं आहे.