छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहचविण्याचा वसा उचलणारे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे शिवकालीन चित्रपटांचे ‘शिवराज-अष्टक’ सादर करणार आहेत. याआधी त्यांनी फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' हे चित्रपट दिले आणि आता तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला त्यांचा नवीन चित्रपट 'शेर शिवराज’ याची घोषणा करण्यात आली.
शिवनेरी येथे श्री शिवजयंती उत्सव अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही हा उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला. सकाळी किल्ले शिवनेरीवर श्री शिवाईदेवीच्या महापूजेने उत्सवास सुरुवात झाली. यावेळी किल्ले शिवनेरीवर उत्साहाचं वातावरण आणि शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सोहळयासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उपस्थित होते.
दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते श्री शिवाईदेवीची महापूजा करण्यात आली. ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत महाराजांचा इतिहास घराघरांत पोहचविण्याचा मानस बोलून दाखवितानाच व्यवसायापलीकडे जाऊन आता ही चळवळ झाली असून चित्रपटाच्या माध्यमातून तिचा अधिकाधिक प्रसार हेच माझे ध्येय असल्याचे दिग्पाल लांजेकर यावेळी म्हणाले.