हैदराबाद - आपल्या आवडत्या कलाकाराच्या भेटीसाठी चाहते काय काय करतात हे वाचल्यावर अजब वाटते. यापूर्वी सलमान खान, शाहरुख यांच्या भेटीसाठी दूरवरुन प्रवास करुन पोहोचलेल्या चाहत्यांबद्दल आपण वाचले होते. अलिकडेच अभिनेता रामचरणला भेटण्यासाठी शेकडो किलो मीटरवरुन एक चाहता पोहोचला होता. आता अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या भेटीसाठी एक चाहता तेलंगणा राज्यातून थेट कर्नाटकात म्हैसूरच्या पुढे राहणाऱ्या रश्मिकाच्या भेटीसाठी पोहोचला होता.
आकाश त्रिपाठी असे या रश्मिकाच्या चाहत्याचे नाव आहे. हा गडी तेलंगणातून थेट म्हैसूरला पोहोचला. त्यानंतर त्याने गुगल सर्चच्या मदतीने रश्मिका मंदानाचा पत्ता शोधून काढला. कोडगु येथे ती राहात असल्याचे समजल्याने तो पत्ता शोधत पोहोचला. घर शोधत असताना स्थानिक लोकांनी त्याच्याबद्दल पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशी केली असता हा जबरा फॅन ९०० किलो मीटरचा प्रवास करुन पोहोचल्याचे लक्षात आले.
सध्या रश्मिक मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती 'मिशन मजनू' आणि 'गुडबाय' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी मुंबईत एका अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी गेली आहे. त्यामुळे तिची भेट होणे शक्य नव्हते. ही माहिती जेव्हा रश्मिकाला कळली तेव्हा तिने असे न वागण्याचा सल्ला आपल्या फॅन्सना दिला आहे.