गुरुदासपूर - भारतीय जनता पक्षाने अभिनेता सनी देओल याला गुरुदासपूरमधून निवडणूकीच्या मैदानात उतरवले आहे. ढाई किलो का हात काँग्रेसवर भारी पडणार असे गणित भाजपने मांडलंय. आज सनीने गुरूदासपीरमधून रोड शो करीत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.
सनीचे बाबा धर्मेंद्र यांनी मुलासाठी ट्विट करत विजयाची खात्री व्यक्त केली आहे. सनी देशाची सेवा करेल असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय. संधी मिळाली तर सनी लोकांची उत्तम सेवा करेल असे सांगत जनतेला धर्मेंद्र यांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
धर्मेंद्र यांनी यापूर्वी बिकानेर येथून भाजपतर्फे निवडणूक लढवून विजय मिळवला होता. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी मथूरा येथून भाजप तर्फे निवडणूक लढवीत आहे.
गुरुदासपूरमधून यापूर्वी भाजप तर्फे अभिनेता विनोद खन्ना खासदार होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणूकीत काँग्रेसच्या सुनिल कुमार जाखड यांनी ही जागा जिंकली होती. १ लाख ९३ हजार मतांनी भाजप उमेद्वाराला जाखड यांनी पराभूत केले होते. यंदाच्या निवडणूकीत सनी देओल यांचा सामना काँग्रेसच्या सुनिल कुमार जाखड यांच्याशीच आहे. सनीसाठी ही निवडणूक सहज सोपी नाही.