मित्राच्या वाढदिवसाला कोणी आवडत्या वस्तू, कपडे, केक, फुले, भेटकार्ड देतं, तर कुणी सरप्राईज पार्टी. पण जर कोणी आपल्या मित्राला वाढदिवसाला चक्क सुपरस्टारसोबत सिनेमात एक भूमिकाच गिफ्ट दिली तर? हो, असंच एक सरप्राईज दबंग गिफ्ट प्रसिद्ध कॅमेरामन महेश लिमये यांनी आपला मित्र अभिनेता देवेंद्र गायकवाड याला दिले आहे.
वाढदिवसाचे अनोखे 'दबंग' गिफ्ट - Bollywood
मराठमोळा अभिनेता देवेंद्र गायकवाड याच्या वाढदिवसाला मोठे गिफ्ट मिळाले आहे. महेश लिमये हे सलमानच्या आगामी दबंगच्या सीक्वल चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. त्यांनी देवेंद्रला वाढदिवसा दिवशी सेटवर बोलवून घेतले आणि त्याला चक्क भूमिका देण्यात आली.
महेश लिमये सुपरस्टार सलमान खानच्या ‘दबंग ३’चे कॅमेरामन आहेत. दिनांक २६ ऑगस्ट रोजी देवेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस होता. महेश लिमये यांनी पुण्याजवळील फलटण येथून 'दबंग ३'च्या शूटींग सेटवरून देवेंद्र गायकवाड याला फोन करून फलटणला बोलावून घेतले आणि त्याला वाढदिवसाचे सरप्राईज गिफ्ट म्हणून चक्क 'दबंग ३' मध्ये एक छोटी भूमिका दिली.
देवेंद्रने छोट्याशा भूमिकेत केलेल्या अभिनयाचे दिग्दर्शक प्रभू देवा, सुपरस्टार सलमान खान आणि संपूर्ण युनिटने कौतुक केले आणि त्याला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. देवेंद्र गायकवाड यांनी यापूर्वी ‘मुळशी पॅटर्न’, ‘बबन’, ‘देऊळ बंद’, ‘एक हजाराची नोट’, ‘किल्ला’, ‘रेगे’, ‘मंगलाष्टक - वन्स मोर’ 'सलाम' यासारख्या चित्रपटांमध्ये तसेच तुझं माझं जमेना, बेधुंद मनाच्या लहरी, पिंपळपान अशा अनेक मालिका आणि अनेक प्रायोगिक आणि 'माकडाच्या हाती शॅम्पेन' सारख्या व्यावसायिक नाटकांत भूमिका साकारल्या आहेत. २००४ साली देवेंद्रच्या ‘देता का करंडक’ या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळाला होता.