कोरोना विषाणूचा पुन्हा झालेला उद्रेक महाराष्ट्राला जास्त सतावत आहे. रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत असतानाच मनोरंजनसृष्टीही पुढे सरसावली आहे. शिवकालीन चित्रपट 'सरसेनापती हंबीरराव टीम' प्रदर्शनासाठी तयार होता असून चित्रपटाच्या टीमने सामाजिक बांधिलकी जपत एक रुग्णवाहिका पुणेकरांच्या सेवेला अर्पण केली. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
आजही राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असताना पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजहितासाठी काहीतरी करण्याचा विचार टीम सरसेनापती हंबीररावच्या मनात होता. त्यादृष्टीने टीम सरसेनापती हंबीरराव तर्फे पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह सर्व सोई सुविधायुक्त विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. ही रुग्णवाहिका संपूर्ण पुणे शहरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.