मुंबई -आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडला मिळालेला नवा चेहरा म्हणजे जायरा वसीम. तिच्या अभिनयाने तिने पहिल्याच चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जायराने बॉलिवूडमधुन एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.
जायराने 'दंगल' चित्रपटात गीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटातही ती झळकली. या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 'दंगल' चित्रपटाने तर चीनमध्येही बॉक्स ऑफिस गाजवले. असे असुनही तिने हा निर्णय का घेतला, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.