मुंबई -यंदा वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बॉलिवूडच्या दोन मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळतेय. सलमान खानचा 'दबंग ३' मागच्या आठवड्यात २० डिसेंबरला प्रदर्शित झाला. तर, अक्षय कुमारचा 'गुड न्यूज' हा २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'दबंग ३' चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर 'गुड न्यूज' चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली आहे.
'दबंग ३' चित्रपटाने पहिल्या दिवशी २४.५० कोटीची ओपनिंग केली होती. तर, गुड न्यूजने १७.५६ कोटीची कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांच्या शर्यतीबाबत सलमान खानला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा 'अक्षयच्या चित्रपटांनी माझ्या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करावी', असे तो म्हणाला. 'प्रत्येकाच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळावा, असे मला वाटते. अक्षय कुमारच नाही, तर, त्याच्या जागेवर शाहरुख किंवा इतर कोणाचाही चित्रपट असता, तरीही त्यांच्या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळावा', असे सलमान खान यावेळी म्हणाला.
हेही वाचा -भाईजानचा वाढदिवस, कॅटरिना कैफ, संगीता बिजलानीसह बॉलिवूडकर सहभागी