आपल्या देशात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रिकेटचे वेड आहे. याच क्रिकेटवर आधारित 'फ्री हिट दणका' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. काहीच दिवसांपूर्वी 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने अधिकच वाढली आहे.
उघडेवाडी गावातील धुमाकुळ पाटील आणि निगडेवाडी गावातील अण्णा पाटील या दोन पाटील घराण्यांमध्ये वैमनस्य असून धुमाकुळ पाटीलाच्या मुलाचे अण्णा पाटीलांच्या मुलीवर प्रेम असते. आता या दोघांच्या प्रेमाचे भविष्य या दोन गावांमध्ये दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेवर अवलंबून आहे. या दोघांचे प्रेम कसे जुळते, त्यांच्या प्रेमाचे पुढे नक्की काय होते आणि या दोन गावांमध्ये नक्की कोणत्या कारणामुळे वैमनस्य आहे या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना ‘फ्री हिट दणका' चित्रपटातून मिळतील.