मुंबई -दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट शुक्रवारी (१० जानेवारी) देशभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेते संजय दत्त यांनी महाविकास आघाडी सरकारला केली आहे.
हेही वाचा -'मला तुझा अभिमान वाटतो', दीपिकाचा 'छपाक' पाहून रणवीर सिंग भावूक
मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट समाजात सकारात्मकता निर्माण करणारा आहे. तसेच यामधुन सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचेल. लक्ष्मी अग्रवाल आणि तिच्यासारख्या बऱ्याच अॅसिड हल्ल्यातून धैर्याने उभारी घेणाऱ्या तरूणींची कथा या चित्रपटाद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी, यासाठी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा. तसेच हा चित्रपट टॅक्स फ्री झाला तर, बरेच लोक हा चित्रपट पाहतील, असे संजय दत्त म्हणाले आहेत.
हेही वाचा -मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दीपिकाचा 'छपाक' टॅक्स फ्री
'छपाक' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बरेच वादविवादही झाले आहेत. दीपिकाने जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. तसेच 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा, असे हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेण्ड झाले. मात्र, काही जणांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. तसेच, हा चित्रपट पाहावा, असे आवाहनही केले आहे.