जैसलमेर- आजकाल जैसलमेरमध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या बच्चन पांडे चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. जे वादाच्या भोवऱयात सापडलेले दिसते. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कलाकार आणि निर्मात्यांवर कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून जैसलमेरच्या पर्यटनस्थळांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. स्थानिक सीजेएम कोर्टात आदित्य शर्माच्या वतीने अॅडव्होकेट कंवरराज सिंह यांनी चित्रपटाचे स्टारकास्ट अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, कृती सेनन, अरशद वारसी आणि निर्माता साजिद नाडियाडवाला, विक्रांत टंडन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात कोर्टाने विक्रांत टंडन यांना समन्स बजावून बच्चन पांडे चित्रपटाच्या शूटिंगच्या मान्यतेची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याला उत्तर म्हणून अॅडव्होकेट दीपक चौहान यांनी चित्रपट निर्मात्यांच्या वतीने उत्तर सादर केले. ते म्हणाले की, तक्रारदाराने न्यायालयात आपले निवेदन नोंदवले नाही किंवा तक्रारीत नमूद केलेल्या तथ्यांबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. ही तक्रार केवळ कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी आणि अर्जदारांना त्रास देण्यासाठी देण्यात आली आहे. जेव्हा तक्रार दाखल केली जाते तेव्हा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 200 किंवा 202 चे पालन करणे आवश्यक असते आणि प्रक्रिया घेतल्यानंतरच न्यायालय आरोपीला समन्स बजावू शकते, या टप्प्यावर न्यायालयात पुराव्यांची कागदपत्रे मागू शकत नाहीत.