मुंबई - बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांनी आजवर हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या विनोदांनी त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. आता मराठी चित्रपटांमध्येही त्यांची विनोदशैली दिसणार आहे. 'विकून टाक' या मराठी चित्रपटातून ते मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
'विकून टाक' हा धमाल कॉमेडी चित्रपट राहणार आहे. यामध्ये चंकी पांडे यांच्यासोबत शिवराज वायचळ, हृषिकेश जोशी, समीर चौघुले, रोहित माने, ऋतुजा देशमुख, राधा सागर, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर, समीर पाटील आणि आदिती जादव यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा -मराठीतील सगळ्या विनोदवीराना आदरांजली ठरेल असा विनोदी सिनेमा आहे 'चोरीचा मामला'
'पिरमाचा इस्कोट की किडनीचा घोळ.?'नेमका झालाय कसला झोल.?, अशी टॅगलाईन असलेला या ट्रेलरमध्ये हास्यविनोदांचे कारंजे पाहायला मिळतात. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी चंकी पांडे यांनी 'विकून टाक' चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली होती. 'फुल ऑन मनोरंजनाच्या गावात गड्या चल आनंदीआनंद घेऊन टाक...चंकी पांडे येतोय मराठी चित्रपटात म्हणतोय 'विकून टाक', असे कॅप्शन देऊन त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.
हेही वाचा -झी मराठीवरील 'अळीमिळी गुपचिळी' शोमध्ये छोटे उडवणार मोठ्यांची भंबेरी
समीर पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, उत्तुंग ठाकूर यांनी निर्मिती केली आहे. 'बालक पालक', 'यलो', 'डोक्याला शॉट' यांसारख्या चित्रपटानंतर आता ते 'विकून टाक' हा चित्रपट घेऊन येत आहेत.