महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

#बालदिन विशेष : चैत्या-दगडू- पिस्तुल्या या बालकलाकारांनी उमटवलाय मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा - बालकलाकार

चित्रपटसृष्टीत बालकलाकारांचे महत्व खूप मोलाचे आहे. कथेला उंचीवर नेण्यासाठी प्रत्येक कलाकाराचे योगदान आवश्यक असते. मात्र बालकलाकारांकडून अपेक्षित परिणाम साधणारा अभिनय करुन घेताना दिग्दर्शकांचे कौशल्य पणाला लागते. अशावेळी अंगभूत अभिनय गुण असलेले बालकलाकार असतील तर दिग्दर्शकाचे कामही सोपे होते आणि अपेक्षित परिणामही साधता येतो.

मराठमोळे बालकलाकार

By

Published : Nov 14, 2019, 9:31 AM IST


मराठी चित्रपटसृष्टीत असंख्य बालकलाकारांनी आपले योगदान दिले आहे. त्यातील सर्वाधिक यश मिळवणाऱ्या कलाकारांच्या यादीत सर्वात वरचे स्थान सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांचे आहे. यांनी बालकालाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि वाढत्या वयाबरोबरच ते नायक म्हणूनही रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरले. पण त्यासोबतच अगणित बालकलाकारांनी स्वतःला अभिनयक्षेत्रात आजमावले आहे.

लता मंगेशकर

मराठमोळे बालकलाकार
लतादीदींची आजची ओळख गानसम्राज्ञी अशी असली तरी त्यांनीही बालकलाकार म्हणून चित्रपटात काम केले होते. नवयुग निर्मित पहिली मंगळागौर या चित्रपटात लता मंगेशकर यांना बालकलाकार म्हणून मास्टर विनायक यांनी संधी दिली होती. या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे गीतदेखील गायले होते. लता दिदींप्रमाणेच अनेक बालकलाकारांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पण इतिहासात न जाता आजच्या यशवंत बालकलाकारांवर थोडी नजर टाकूयात.

केतकी माटेगावकर

मराठमोळे बालकलाकार
आजच्या बालकलाकारांचा विचार करता अतिशय बुध्दीवान आणि गुणसंपन्न मुले चित्रपटसृष्टीत सहज वावरताना दिसतात. यातीलच एक नाव आहे केतकी माटेगावकर हिचे. गायनाचा पिंड असलेली केतकी सारेगमपमधून प्रेक्षकांसमोर आली. आजारपणामुळे तिला स्पर्धेतुन बाहेर पडावे लागले, दरम्यान केतकीने २०१२ मध्ये मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित शाळा या मराठी चित्रपटामार्फत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, मुळातच ही कादंबरी अतिशय गाजलेली असल्याने त्यावरील या चित्रपटास देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शालेय जीवन, पहिलं प्रेम अशा अनेक गोष्टींचं चित्रण या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते.

या चित्रपटानंतर केतकीने "आरोही… गोष्ट तिघांची" या कौटुंबिक सामाजिक चित्रपटात "मृणाल कुलकर्णी" व "किरण करमरकर" या कलाकारांसमवेत रुपेरी पडद्यावर झळकली. यानंतर प्रतिकुल परिस्थितीतून शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीच्या प्रवासाची कथा सांगणारा तानी हा चित्रपट केला, यानंतर महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्श या चित्रपटात केतकीने प्रिया बापट हिच्या लहानपणीची भूमिका रंगवली, केतकी माटेगावकर यांना त्यांच्या काकस्पर्श या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म अँन्ड थिएटरचा २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

२०१४ मध्ये आलेला रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. यात तिच्या सोबत आहे प्रथमेश परब हा नवोदित कलाकार होता. किशोरवयातील प्रेम यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट होता. तसेच नंतरच्या काळात फुन्त्रू या मराठी चित्रपटात देखील ती दिसली.

प्रथमेश परब

मराठमोळे बालकलाकार

प्रथमेश परब या उदयोन्मुख कलाकाराने टाइमपासमध्ये मुख्य पात्राची भूमिका करण्यापूर्वी त्याने बालक-पालकमध्ये एक छोटीशी भूमिका केली. त्याने आपल्या भूमिकांची एक छोटी आवृत्ती म्हणून टाइमपास २ या चित्रपटातील भूमिकांची पुनरावृत्ती केली. त्याला स्टार स्टडर्ड वार्षिक लाइफ ओके स्क्रीन अवॉर्ड मिळाला आहे. प्रथमेशचे वय वाढत असले तरी त्याच्यातील कलाकार बहरत चाललाय. दृष्यम या हिंदी चित्रपटातही तो झळकला होता. उर्फी, लालबागची राणी, खिचीक, टकाटक अशा चित्रपटातून तो नायकाच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकला आहे.


पार्थ भालेराव

मराठमोळे बालकलाकार

पार्थ हा नव्या दमाचा उत्तम बालकलाकार हिंदी आणि मराठी सिनेमाला मिळाला आहे. त्याने सर्वात पहिल्यांदा खालती डोके वरती पाय या मराठी चित्रपटात काम केले असले तरी त्याचा पहिला हिंदी चित्रपट त्यापूर्वीच रिलीज झाला भूतनाथ रिटर्न्स. विशेष म्हणजे याच तो बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकला होता. किल्ला या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी ६२ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्काराने सन्मान झाला.

सध्या पार्थ अनेक चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यग्र असून त्याने वीस म्हणजे वीस, डिस्को सन्या, बॉईज आणि फिरकी या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.

सूरज पवार

मराठमोळे बालकलाकार
बालकलारांच्या यादीत अत्यंत वेगळ्या धाटणीचा कलाकार म्हणून सूरज पवारची ओळख होऊ शकते. ग्रामीण भागातील हा एक सामान्य मुलगा नागराज मंजूळेंच्या नजरेस पडला आणि त्याचे सोने झाले. पिस्तुल्या या शॉर्टफिल्ममध्ये त्याने पहिली भूमिका साकारली. या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर नागराजचा फँड्री हा पूर्ण लांबीचा चित्रपट झळकला यात सूरज पवारची महत्त्वाची भूमिका होती. आता वयाबरोबरच सूरज वाढलाय. त्याच्यातील कलाकारही वाढीस लागलाय. सैराट या गाजलेल्या सिनेमात त्याने प्रिन्सची भूमिका साकारली होती.

श्रीनिवास पोकळे

मराठमोळे बालकलाकार
अलिकडच्या काळात सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय ते नाळ चित्रपटातील चैत्या या छोट्या व्यक्तीरेखेने. श्रीनिवास पोकळे असे या छोट्या चैत्याचे नाव आहे. विदर्भातील हा पोट्टा आता सर्वांचाच लाडका बनलाय. नाळ सिनेमात या बालकलाकाराने कमाल केली आहे. विविध प्रसंगातो तो सहज अभिनयाने बाजी मारतो. ‘जाऊ दे न वं’ गाणही धम्माल.

ABOUT THE AUTHOR

...view details