मुंबई -अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. उद्या म्हणजेच १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाच्या अडचणींमध्ये एकापाठोपाठ एक वाढ होत आहे. अलिकडेच दीपिकाने जेएनयू येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त करत आंदोलनात सहभागी झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविरोधात #BoycottChhapaak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. आता या चित्रपटासंबधी पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी या चित्रपटात लक्ष्मी अग्रवालवर अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलले आहे. लक्ष्मीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव नदीम खान असे होते. मात्र, या चित्रपटात हे नाव बदलून राजेश करण्यात आले आहे.
हेही वाचा -जेएनयू हिंसाचार : दीपिकाच्या समर्थनार्थ उतरली सोनाक्षी सिन्हा, केले 'हे' टि्वट
यावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत निराशा व्यक्त केली आहे. एका युजरने याबाबत लिहिलं आहे, की 'तुम्ही घटनाक्रम नीट पाहा. हा चित्रपट लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित सत्य कथा आहे. तिच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव बदलून हिंदू धर्मीय नाव ठेवले आहे. अशात दीपिकाचे जेएनयू येथे जाणं हे मुळीच आश्चर्यकारक वाटत नाही. चित्रपटात नाव बदलून हिंदू असलेले नाव का वापरण्यात आले आहे?'