माणसाला कधी कधी आपला स्वभाव किंवा विचार काबूत ठेवणं शक्य होत नाही, तेव्हा विचारांच्या चाबकाचे फटकारे त्याच्या मनावर उमटतात. थोडक्यात, शरीरालाच नव्हे तर मनालाही काबूत ठेवण्याचं काम 'चाबुक' करतो. तसेच 'चाबुक' म्हटला की लगेच प्राण्यांना काबूत ठेवण्यासाठी किंवा उधळलेल्या जनावरांना शांत करत आपल्या म्हणण्यानुसार वागायला लावणारं प्रभावी अस्त्र आठवतं, पण ‘चाबुक’ कधी नियतीचा, व्यवस्थेचा, प्रारब्धाचा, विचारांचा, रुढी-परंपरांचाही असू शकतो. त्यामुळं सर्वच बाबतीत चाबूकाचं महत्त्व अतिशय वेगळं आहे. असाच एक 'चाबुक' आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
‘श्रीष्टी मोशन पिक्चर कंपनी’ च्या बॅनरखाली ‘चाबुक’ या मराठी चित्रपटाच्या निर्मीती करण्यात आली असून निर्माता कल्पेश भांडारकर यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाची संकल्पना कल्पेश वासुदेव भांडारकर आणि समीर धर्माधिकारी यांची आहे. चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.
कल्पेश भांडारकर हे हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन करत कल्पेश भांडारकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे. आपले थोरले बंधू श्री.मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी हिंदीतल्या अनेक दिग्गजांसोबत चित्रपट केले आहेत. यानंतर ते आता स्वत:ची पहिली मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत.