मुंबई -दरवर्षी १५ सप्टेंबर हा 'इंजिनिअर्स डे' म्हणून साजरा केला जातो. श्री विश्वेशरैय्या यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. विश्वेशरैय्या हे फक्त इंजिनिअरच नव्हते, तर यासोबतच ते अर्थशास्त्रज्ञही होते. त्यांना 'फादर ऑफ मैसूर' असेही म्हटले जात होते. बॉलिवूडमध्येही काही कलाकारांनी इंजिनिअरची पदवी घेतली आहे. मात्र, त्यांना अभिनयात रस असल्याने ते कलाक्षेत्राकडे वळले. आज हेच कलाकार बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार म्हणून ओळखले जातात.
सुशांत सिंग राजपूत -
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने दिल्ली येथील टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याने शेवटच्या वर्षात असताना कॉलेजला रामराम ठोकला. मात्र, ऑल इंडिया इंजीनियरिंग एन्ट्रांस एक्झाममध्ये त्याला ७ वा क्रमांक मिळाला होता. सुशांत सिंगने 'काई पो चे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम एस धोनी', 'केदारनाथ' आणि 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटातून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.
आर. माधवन -
'रेहना है तेरे दिल मे' या पहिल्याच चित्रपटातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आर. माधवननेही इंजिनिअरिंगची शिक्षण घेतलं आहे. 'तनु वेड्स मनू', 'तनु वेड्स मनु रिटर्न्स', 'थ्री - इडियटस' यांसारख्या चित्रपटात त्याने दमदार अभिनय साकारला आहे. त्याने कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे.