मुंबई -अवघ्या विश्वाला आपल्या संगीताने मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय संगीतकार ए. आर. रेहमान यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १९६७ साली झाला होता. आज ते त्यांचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दोनवेळा ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरणारे ए. आर. रेहमान यांनी हे यश मिळवण्यासाठी अथक मेहनत केली आहे. त्यांचा सुरुवातीचा काळ हा अतिशय संघर्षमय होता. तरीही फक्त आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी....
१. ए. आर. रेहमान यांना बालपणी कंम्प्युटर इंजिनिअर बनायचे होते.
२. ते शाळेत सतत गैरहजर राहत असल्यामुळे त्यांना वयाच्या १५ व्या वर्षी शाळेतून काढून टाकण्यात आले होते.
३. 'ए. आर. रेहमान - द स्पिरिट ऑफ म्यूझिक' या पुस्तकात उल्लेख आहे, की 'ए. आर. रेहमान यांना बालपणी इलेक्र्टॉनिक गॅजेट आणि तंत्रज्ञानाची प्रचंड आवड होती'.
४. त्यांनी मुस्लीम धर्म स्विकारला आहे. मात्र, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, की त्यांचे खरे नाव दिलीप कुमार असे आहे. योगायोगाने त्यांच्या पत्नीचे नाव सायरा बानो असे आहे.
५. ए. आर. रेहमान यांच्या मुलाचा अमिनचा जन्म देखील ६ जानेवारीचा आहे.
६. संगीतकार बनण्यापूर्वी रेहमान हे किबोर्ड वादक होते. चैन्नई स्थित 'नेमेसीस अॅव्हेन्यू' बॅन्डमध्ये ते किबोर्ड वादक म्हणून काम करत असत.
७. रेहमान यांना ओळख मिळवून देणारा चित्रपट 'रोजा' मानला जातो. मात्र, यापूर्वीच त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मल्याळम चित्रपट 'योद्धा' हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट होता.
८. रेहमान यांनी संगीत दिलेलं 'स्लमडॉग मिलिनियर' चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार विजेता गाणं 'जय हो' हे सलमान खानच्या 'युवराज' चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, या चित्रपटात हे गाणं वापरण्यात आलं नाही. म्हणून 'स्लमडॉग मिलिनियर' या चित्रपटात या गाण्याचा समावेश करण्यात आला.