हिंदी मराठी चित्रपटातून सर्व प्रकारच्या भूमिका साकारणारा, हरहुन्नरी मल्टी टॅलेंटेड अभिनेता सिध्दार्थ जाधव आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करतोय. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सिध्दार्थने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे.
सिध्दार्थला अभिनयाची आवड कॉलेज जीवनातच लागली. मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. इथेच तो एकांकिकामध्ये रमला. त्यानंतर त्याने देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून काम केले आणि व्यावसायिक रंगभूमीशी तो जोडला गेला. जागो मोहन प्यारे, तुमचा मुलगा करतोय काय, लोच्या झाला रे, गेला उडत ही त्याची गाजलेली व्यावसायिक नाटके आहेत.
आजवर त्याने 25 हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. अतिशय एनर्जटिक अभिनेता अशी त्याची ओळख हिंदी सिनेमातही आहे. 'गोलमाल : फन अनलिमिटेड' या चित्रपटात त्याची भूमिका छोटी होती, मात्र त्याने आपली एक छाप यातून सोडली आणि तो प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. इतकेच नाही तर मिथुन चक्रवर्तीसोबत त्याने (Ami Subhash Bolchi) 'आमी सुभाष बोलची' या बंगाली चित्रपटातही भूमिका साकारली आहे. गोलमाल रिटर्न, सिम्बा आणि राधे या बॉलिवूड चित्रपटातही तो झळकला होता.
सिध्दार्थने टीव्ही मालिकातही भरपूर काम केले आहे. काही मराठी डान्स रियालिटी शोचे परीक्षणही त्याने केलंय. अशा या उत्साही अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर गर्दी केली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : "सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला", म्हणत कोल्हापूरातील रंगकर्मींचा आनंदोत्सव