मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण तेलुगू सुपरस्टार प्रभाससोबत पहिल्यांदाच एका भव्य सिनेमात काम करणार आहेत. हा चित्रपट २०२२मध्ये प्रदर्शित केला जाणार असून अद्याप याची कथा आणि शीर्षक गुलदस्त्यात आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी बच्चन यांनी काम करण्यास संमती दिल्याबद्दल स्वतःला भाग्यवान म्हटलंय. अश्विन म्हणाले, ''बच्चन सरांकडे अनेक प्रोजेक्ट असताना त्यांनी आमची निवड केली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान आणि धन्य समजतो. ही एक संपूर्ण लांबीची व्यक्तीरेखा आहे आणि त्याला ते न्याय देतील हा विश्वास आम्हाला आहे.''
वैजयंती मुव्हीज या नामवंत प्रॉडक्शन हाऊसची हा आगामी सिनेमानिर्मिती असेल. वैजयंती मुव्हीजचे संस्थापक निर्माते अश्विनी दत्त म्हणाले, ''एनटीआर आणि मी शोले हा चित्रपट अनेकवेळा पाहिला होता. एनटीआर यांच्या रामकृष्ण थिएटरमध्ये हा सिनेमा वर्षभर लागला होता. इतक्या वर्षांनी भारताचे सर्वश्रेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचे स्वागत करणे खरोखर माझ्यासाठी एक गौरवशाली आणि अत्यंत समाधानकारक क्षण आहे. आमच्या बॅनरच्या प्रतिष्ठीत चित्रपटात बच्चन काम करीत आहेत."
प्रभास याची बिग बी किंवा दीपिकाबरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या या दोन स्टार कलाकारांनी आरक्षण आणि पीकू या चित्रपटात एकत्र काम केले होते.