मुंबई - नुकत्याच काही राज्यांच्या निवडणूक तारखा घोषित झाल्या, ज्यात पश्चिम बंगालचा सुद्धा समावेश आहे. तेथील सामान्य माणसाचा मतदानादिवशीच राजकारणाशी संबंध येईल. परंतु एका मराठी सिनेमाचा संबंध पश्चिम बंगालशी जुळून आलाय. ‘अवांछित’ चित्रपटाचे बहुतांश शूटिंग कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांत झाले आहे. दोन वेगळी शहरं, दोन वेगळ्या संस्कृती, भाषा वेगळी, राहणीमान वेगळं पण यांना बांधून ठेवणारा दुवा म्हणजे ‘अवांछित’ हा मराठी सिनेमा.
पश्चिम बंगलच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांना घालण्यासाठी दिग्दर्शक शुभो बासु नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा त्यांच्या 'फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट' प्रस्तुत 'अवांछित' या मराठी चित्रपटाद्वारे सज्ज झाले आहेत. त्तर कोलकातामधील लाहाबाडीसह दक्षिण कोलकातामधील विविध कॅफेटेरिया आणि ऑलिगोमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. मराठी भाषेत तयार होणाऱ्या 'अवांछित' या चित्रपटाची सर्व लोकेशन्स चित्रपटाच्या कथेप्रमाणेच वैशिष्ट्येपूर्ण आहेत. कोलकातामधील डोळ्याचं पारणं फेडणारी विस्तीर्ण अशी बहुतांश सौंदर्यस्थळे प्रथमच मराठी प्रेक्षकांना वेड लावणार आहेत.
दोन वेगळ्या संस्कृती, शहरं, भाषा असं का म्हंटलंय तर ‘अवांछित’ या आगामी मराठी सिनेमाची कथा मराठी, दिग्दर्शक बंगाली, सिनेमातील कलाकार मराठी आणि बंगाली, सिनेमाचे लोकेशन पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील. आपल्या मराठीतील हरहुन्नरी कलाकार किशोर कदम, मृणाल कुलकर्णी, अभय महाजन, मृण्मयी गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण आणि राजेश शिंदे हे या सिनेमाचा भाग आहेत. त्यांच्यासह बंगाली अभिनेते बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर या प्रमुख बंगाली कलाकारांचाही अभिनय मराठी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
'अवांछित'मध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणे विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचं नकळत त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच आईने जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी खटकून वागू लागतो. बापलेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते.
या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक,शुभो बासु नाग म्हणाले, "बऱ्याच जणांना आश्चर्य वाटत असावं की मी बंगाली असून मी माझं दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल मराठी सिनेमातून उचलतोय. वयाच्या २०व्या वर्षी जेव्हा मी महाराष्ट्रात आलो तेव्हापासून महाराष्ट्राविषयी प्रेम वाटू लागलं आहे. मराठी भाषा मला आवडते आणि मी ती शिकतोय. आज मी जो काही आहे तो मुंबई शहरामुळे आणि मी याचं देणं लागतो म्हणून माझा पहिला सिनेमा हा मराठीत आहे. खरं तर पहिल्याच सिनेमात प्रतिभावान आणि प्रोफेशनल कलाकारांसोबत काम करायला मिळाले यातच मला खूप आनंद वाटतोय. सर्वांकडून मला सहकार्य मिळाले. एकंदरीत अनुभव खूप छान होता. 'अवांछित' सिनेमाच्या कथानकाची गरज म्हणून सिनेमाचे शूटिंग कलकत्त्यात झाले आहे. कलकत्त्यात मी लहानाचा मोठा झालो पण खऱ्या अर्थाने मी मुंबईत मोठा झालो, माणूस म्हणून घडत गेलो म्हणून 'अवांछित' हा माझा सिनेमा दोन्ही शहरांसाठी माझ्याकडून एक ट्रीब्युट आहे"
येत्या १९ मार्चला ‘अवांछित’ हा सिनेमा झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘अवांछित' चित्रपटाच्या निमित्ताने बंगाली-मराठी कलावंत पडद्यावर एकत्र! - पश्चिम बंगलच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांना
‘अवांछित' हा नवा मराठी सिनेमा बंगालच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झाला आहे. विशेष म्हणजे याचे दिग्दर्शन बंगाली आहे. मराठीतील दिग्गज व्यावसायिक कलाकार आणि बंगाली कलाकार यांच्यात यात भूमिका आहेत. येत्या १९ मार्चला ‘अवांछित’ हा सिनेमा झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘अवांछित'
हेही वाचा - आमिर खानचे ‘आयटम सॉंग’, एली अवराम सोबत!