मुंबई - जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला 'बाटला हाऊस' हा चित्रपट २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. जामिया नगरच्या बाटला हाऊसमध्ये दहशतवादी असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली होती आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र, काही राजकीय लोकांनी ही चकमक खोटी असल्याचे सांगितले होते. बाटला हाऊसमध्ये असलेले लोक दहशतवादी नसल्याचा दावा केला जात होता. या सत्यतेचा उलगडा बाटला हाऊस चित्रपटातून केला जाणार आहे.
१३ सप्टेंबर २००८ मध्ये दिल्लीत बॉम्बस्फोट झाले होते. यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता तर १३३ लोक गंभीर जखमी झाले होते. यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १९ सप्टेंबरला एक ऑपरेशन चालवले, यात बाटला हाऊसच्या एका फ्लॅटवर छापा मारण्यात आला. या दरम्यान कथित दहशतवादी आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद यांना पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या.