मुंबई - आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' चित्रपट २८ जून रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. बऱ्याच अडचणींना पार करत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सर्वांचे लक्ष चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लागले होते. आता या चित्रपटाच्या कमाईचे पहिल्या दिवशीचे आकडे समोर आले आहेत.
'आर्टिकल १५' चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास ४ ते ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून जातीभेदाचं वास्तव या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. आयुष्मानने या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत झळकला. त्याचे आजवरचे चित्रपट नेहमी काही ना काही संदेश घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'आर्टिकल १५' मधुनही समाजात काहीतरी बदल घडावा यासाठी प्रयत्न केला आहे.
बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. विकी कौशलनेही आयुष्मानला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, चित्रपट समीक्षकांनीही चित्रपटाचं कौतुक केले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. आता हा चित्रपट विकेंडला किती आणखी किती गल्ला जमवतो आणि प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया या चित्रपटावर येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.