मुंबई -अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वीच तिने तिला कॅन्सर असल्याचे सांगितले होते. यावर तिच्यावर उपचारही करण्यात आले आहेत. केमोथेरपीच्या उपचारानंतर तिला तिचे केस कापावे लागले होते. त्यामुळे तिचा नवा लूक पाहायला मिळाला होता. अलिकडेच ती कॅन्सरमधुन बरी झाली आहे. आता तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहुन आयुष्मानने तिला एका अभिनेत्याचे नाव दिले आहे.
ताहिराने तिच्या फोटोसोबत ९० च्या दशकातील अभिनेता हरीश कुमारचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहलेय की, 'हा माझा सकाळी सकाळी कोणतंही केसांचं प्रोडक्ट न वापरता काढलेला फोटो आहे. आयुष्मान मला नेहमी हरीश नावाने बोलवत असतो. बऱ्याच दिवसांपर्यंत मला यामागचं कारण समजलं नाही. मात्र, मला असं वाटलं की, जे आपल्यावर प्रेम करतात ते आपल्याला कोणत्याही नावाने साद घालू शकतात. मात्र, मला नंतर हा फोटो मिळाला'.