Pavankhind : बाजीप्रभू देशपांडेंची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ ला प्रेक्षक जोरदार पाठिंबा!
'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' ('Farzand' and 'Fatehshikast' ) या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर (Writer-director Digpal Lanjekar) यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरे सुवर्णपान 'पावनखिंड' (Pavankhind ) चित्रपटाच्या निमित्ताने उलगडले आहे. पावनखिंडीचा रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूं देशपांडेंच्या (Bajiprabhu Deshpande) स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासांच्या पानांमध्ये दडलेलं हे वैभव आता रुपेरी पडद्यावर अवतरले आहे. उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार... हे आहे ‘पावनखिंड’ चित्रपटाचे सार. घोडखिंडीत सिद्दीच्या सैन्यासाठी बाजीप्रभू हे जणू महाकाळ म्हणून उभे ठाकले होते. एक ढाल व एक तलवार घेऊन लढणाऱ्या बाजीप्रभूंचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. बाजीप्रभूंनी स्वतःच्या देहाची जणू काही तटबंदी करून घेतली होती. बाजीप्रभू यांच्यासोबत त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, कोयाजीराव बांदल, रायाजीराव बांदल आणि बांदल सेनेच्या मराठी मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली.
अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात भूमिका आहेत.
संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी देवदत्त मनिषा बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन अमोल गोळे तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर, देवदत्त मनिषा बाजी यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक तर रंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. ध्वनि आरेखन निखील लांजेकर आणि हिंमाशू आंबेकर यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी प्रतीक रेडीज यांनी सांभाळली आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी किरण बोरकर, सिद्धी पोतदार, दिग्पाल लांजेकर, अक्षय गुप्ता यांनी सांभाळली आहे. विशेष दृश्य मिश्रण भूषण हुंबे यांनी केले आहे.
आलमंड्स क्रिएशन्स निर्मित आणि ए.ए.फिल्म्स प्रस्तुत 'पावनखिंड'ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली असून १८ फेब्रुवारीला 'पावनखिंड' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.