मुंबई - 'अश्विनी ये ना'..हे 'गंमत जम्मत' सिनेमातील हे सुपरहिट गाणं किशोर कुमार यांनी गायले होते, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, हे गाणं गायला आधी किशोर कुमार यांनी ठामपणे नकार दिला होता. हा नकार होकारामध्ये नक्की कसा बदलला याचा मोठा खुमासदार किस्सा या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी पुन्हा सांगितला.
झालं अस की या मराठी गाण्याचं प्रपोजल घेऊन सचिन हे किशोरदांना भेटले. मात्र, त्यांनी हे गाणं गायला ठाम नकार दिला. सचिनजींना यामागचं कारण विचारलं असता, तुमच्या प्रत्येक मराठी गाण्यात 'स' आणि 'च' च्या मध्ये एक शब्द असतो अस हे किशोरदा बोलले. सचिन म्हणाले, अहो असा मराठीत एकही शब्द नाही. त्यावर किशोरदांनी तुम्ही 'चमचा' कस म्हणता असे विचारून तो 'च' आपल्याला उच्चरता येत नाही असे त्यांनी सांगितलं, तसेच तुमच्या मराठीत 'ड' आणि 'द' असा काहीतरी शब्द असतो, त्यावर सचिनजी म्हणाले, अहो असा कोणताच शब्द नसतो! त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की की ते 'ळ' बद्दल बोलत आहेत.
त्यानंतर सचिनजींनी त्यांना तुम्ही गाण्याचा जो भाग गाणार त्यात 'च' आणि 'ळ' हे शब्द नसतील तर..?? असे विचारले. त्यावर आपण हे गाणं नक्की गाऊ असे किशोर कुमार यांनी सांगितले. नंतर ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर यांच्याकडून तसं गाणं लिहून घेण्यात आलं. त्यानंतर मेहबूब स्टुडिओत ते रेकॉर्डिंग करण्यात आले, असा किस्सा सचिनजींनी यावेळी सांगितला.