पुणे- जेवढी मराठी लोकांना कॉमिडी कळते तेवढी कोणालाच कळत नाही. मराठी शब्दात, मराठी भावार्थत वेगळेपण आहे. प्रत्येक क्षणात वेगवेगळे अर्थ काढू शकतो, असं वेगळेपण कुठेही नाही. बाकीच्या लोकांची कॉमेडी ही वेगळीच आहे. हिंदीच्या कॉमेडी बद्दल न बोललेलंच बरं..कॉमेडीमध्ये घुसडेगिरी जे आहे ना ते खूप वाईट असून याचा परिणाम तुमच्यासोबत असलेल्या दुसऱ्या कलाकाराला होतो. तसेच शोधक वृत्ती ठेवली तर आयुष्यात बरेच काही मिळते. मी वेळीवेळी सगळ्यांकडून शिकत राहिलो आणि समृद्ध होत गेलो, असे मत ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी व्यक्त केलं आहे.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकोणिसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अशोक सराफ यांना गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल उपस्थित होते.
चार्ली चॅप्लिन यांच्याकडून विनोदातील कारुण्य समजले
कोणी गुरु नसला तरी अनेकांकडून अनेक गोष्टी मी शिकत गेलो. मी मूळचा बेळगावचा पण वाढलो मुंबईमध्ये. मामांची नाटक कंपनी होती. त्यातून ही अभिनयाची कला पुढे आली. मामा रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.चार्ली चॅप्लिन यांच्याकडून विनोदातील कारुण्य समजले. लॉरेल हार्डी यांचा स्लॅपस्टिक विनोद भावला. राजा गोसावी यांची शब्दफेक आवडली. त्यातून पुढे गेलो, आयुष्यात शोधक वृत्ती ठेवली तर बरेच काही मिळवता येते. मी आजही गोष्टी स्वतः करून बघतो, तेच माझ्या थोड्याफार यशाचे रहस्य आहे, असे यावेळी सराफ म्हणाले.