मुंबई -‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा शब्द आपण एखाद्या ठिकाणी उच्चारला तर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा आपल्याकडे नाही वळल्या तरच नवल. याच नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रायोगिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या आलोक राजवाडेचे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण होत आहे. अतिशय हटके नाव असलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चा पोस्टर, ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात मुंबईत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.
आर. आर. पी. कॉर्पोरेशन प्रा. लि. प्रस्तुत ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ‘च्या भन्नाट ट्रेलर मध्ये. एका मंडळाच्या दहीहंडी उत्सवात सेलिब्रेटी म्हणून 'सविता भाभी'ला आणण्याचा निर्णय होतो. तर पर्ण पेठेच्या ‘हे बघ, आपण ४० वर्षांचे झालो आणि आपल्याला कुणी नाही मिळाले तर आपण एकमेकांशी लग्न करू’ या वाक्याने ट्विस्ट निर्माण झाला आहे. तसेच सई ताम्हणकरच्या ‘मैं वहाँ आकर आपनी इमेज गवां दुंगी, अपनी मिस्ट्री गवां दुंगी, तूम क्या गवां दोगे?’ या प्रश्नावर अभय महाजन ‘व्हर्जिनिटी’ असे उत्तर देतो यातून चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच ताणली गेली आहे.