महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाद्वारे अरुंधती नाग ४० वर्षांनंतर परतणार मराठी सिनेसृष्टीत!

सिने आणि नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री अरूंधती नाग लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तूत ‘मीडियम स्पाइसी’ या सिनेमाव्दारे मराठी चित्रपटसृष्टीत परतणार आहेत.

Arundhati Naag
अरुंधती नाग 40 वर्षांनंतर परतणार मराठी सिनेसृष्टीत

By

Published : Mar 5, 2020, 9:40 PM IST

पद्मश्री अरूंधती नाग यांनी सुमारे ४०वर्षांपूर्वी ‘२२ जून १८९७’ या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर आता विधी कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत, ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमातून त्या मराठीत परत दिसणार आहेत. ही निश्चितच त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे.

अरूंधती नाग यांच्या भूमिकेविषयी सांगताना दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “चित्रपटाचे कथानक आकारत असताना, ‘लक्ष्मी टिपणीस’ या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरूंधती नाग ह्यांचीच प्रतिमा उभी राहिली. लक्ष्मी टिपणीस अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी स्त्री आहे. पण त्यासोबतच ती जेवढी बुद्धीमान आहे, तेवढीच तिच्यात मायेची उब आहे. सिनेमात जेव्हा लक्ष्मीची एन्ट्री होते, तेव्हा तिला पाहताच तिच्या चैतन्यमयी व्यक्तीमत्वाची जाणीव व्हावी, असं मला वाटलं. म्हणूनच अरूंधती यांनाही भूमिका ऑफर केली.”

अरुंधती नाग 40 वर्षांनंतर परतणार मराठी सिनेसृष्टीत

मोहित पुढे म्हणाले, “मी अरूंधती नाग यांना गेली १५-२०वर्ष ओळखतो. त्या जेवढ्या बहुआयामी आणि प्रतिभावान कलाकार आहेत, तेवढ्याच नम्रही आहेत. आपल्या भूमिकेच्या लांबीपेक्षा कलाकृतीत समरसून व्यक्तीरेखेशी एकनिष्ठ राहण्याकडे त्यांचा कल असतो. त्या जरी मराठीत 40 वर्षांनी परतत असल्या तरीही, त्यांचे मराठीवर प्रभुत्व आहे आणि मुख्य म्हणजे सिनेमाच्या भाषेवर त्यांचे प्रेम आहे.”

मराठीतल्या आपल्या पुनरागमनाबाबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री अरूंधती नागही खूप उत्सुक आहेत. त्या मराठी सिनेसृष्टीत परण्याविषयी म्हणाल्या, “४० वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत परतणं, ही निश्चितच आल्हाददायक गोष्ट आहे. परतताना एखाद्या नवोदितासारखी अनुभूती होतेय. बंगळुरूला आमच्या रंगशंकरा नाट्यमंदिरात मोहित त्याच्या नाटकांचे प्रयोग करायला येत असतो. अशाच एका प्रयोगावेळी मोहित मला त्याच्यासोबत बसायची विनंती करत म्हणाला, अरू अक्का, मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतोय. त्यामध्ये तू एक भूमिका करावीस, अशी माझी इच्छा आहे.”

अरूंधती नाग यांना मोहितच्या कलाकृती आवडतात. त्यामूळे त्यांनाही मोहितच्या या सिनेमाचा भाग होणं आवडलं. मोहितसोबतच ललित प्रभाकरचीही त्यांनी प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “चित्रपटाचे कथानक आणि व्यक्तीरेखेविषयीची माहिती मला पाठवण्यात आली होती. पण सेटवर पोहोचल्यावर ती भूमिका जिवंत करताना खरी गंमत आली. ललित प्रभाकरसोबत संहितेचे वाचन केले. ललित त्याच्या भूमिकेत चांगलाच उतरला होता. एका प्रतिभावान दिग्दर्शकासोबत काम करायला आणि एक अद्भुत सशक्त महिलेला साकारायला मिळाल्यावर अभिनेत्री म्हणून काही विशेष अवघड करावं लागलं नाही.”

अरूंधती नाग यांच्या दर्जेदार अभिनयाची प्रशंसा करताना मोहित टाकळकर म्हणतात, “ त्या जरी ज्येष्ठ अभिनेत्री असल्या तरीही आपल्या प्रगाढ अनुभवाचे ओझे घेऊन त्या सेटवर येत नाहीत. त्या दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनाचा आदर करतात आणि मग त्याप्रमाणे आपल्या व्यक्तीरेखेवर काम करतात.”

अरूंधती नाग यांच्यासोबतचा अनुभव सांगताना निर्मात्या विधी कासलीवाल म्हणाल्या, “अरूंधती नाग यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळणे, हा आमचा गौरवच आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वात असलेली विनम्रता आणि आपुलकी यामूळे त्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तिला पटकन आपलंस करून घेतात. त्यामूळेच तर त्या एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्री असूनही त्यांच्याशी पटकन ऋणानुबंध जुळून आला. अरूंधतीजी एवढ्या नैसर्गिक अभिनत्री आहेत, की त्या प्रत्येक शॉटमध्ये परफॉर्म करताना तुम्ही त्यांच्या अभिनयाने मोहित होऊन जाता.”

ल्रॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील. हा सिनेमा ५ जून २०२० ला रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details