मुंबई -दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामुळे त्याला तुफान लोकप्रियता मिळाली. अलिकडेच या चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, 'याच चित्रपटामुळे माझं आयुष्य बरबाद झालं', असे अनुरागने त्याच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनुरागच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाने 'कल्ट' चित्रपटाचा दर्जा मिळवला होता. सप्तवर्षपूर्तीनिमित्त अनुरागने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून मात्र, एक खंत व्यक्त केली आहे. 'या चित्रपटामुळे माझे आयुष्य बरबाद झाले. या चित्रपटापासून मी एकाच प्रकारचे चित्रपट करावे, अशी अपेक्षा प्रेक्षक करतात. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मी पूर्णत: अपयशी झालो आहे. मी आशा करतो की २०१९ मध्ये तरी माझ्या मागची साडेसाती संपून जावी', असे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.