मुंबई - सध्या जेएनयूमधील हल्याविरोधात देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. मुंबईमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि संगीतकार विशाल दादलानी यांनीदेखील सहभाग घेतला होता. बांद्र्याला सुरू असलेल्या एका आंदोलनामधून ते 'गेट वे ऑफ इंडिया' समोरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीही केली. तसेच, अनुरागने थेट सरकारवर निशाणा साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'आपण ज्या सरकारवर विश्वास ठेवत आहोत त्यातील बरेच लोक हे खोटारडे आहेत. आपला अशिक्षितपणा लपवण्यासाठी ते अतिहुशारी दाखवत आहेत. हे सरकार वरपासून खालपर्यंत खोटारडं आहे. जेव्हा सरकार तोंड उघडतं, तेव्हा ते खोटं बोलते', अशी तीव्र प्रतिक्रिया अनुरागने यावेळी दिली.
जेएनयूमधील हल्लेखोर हे सरकारचेच लोक असल्याचेही त्याने म्हटले आहे. सरकार वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळे नियम लागू करत आहे. त्यांनी पोलिसांनाही आपल्या ताब्यात ठेवले आहे, असेही अनुराग यावेळी म्हणाला.