महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 25, 2019, 9:49 PM IST

ETV Bharat / sitara

राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित, राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार वितरण

व्हि. शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी आणि अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे. तर, राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार चित्रपट संकलक वामन भोसले आणि अभिनेते परेश रावल यांना घोषीत करण्यात आला आहे.

राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित

मुंबई -राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि राज कपूर पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. ५६ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी आणि अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे. तर, राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार चित्रपट संकलक वामन भोसले आणि अभिनेते परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे. तसेच, चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच राज कपूर जीवनगौरव आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये तर विशेष योगदानाचे स्वरूप ३ लाख इतके आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या मान्यवरांची सन २०१९ च्या पुरस्कारांसाठी निवड केली.

सुषमा शिरोमणी यांनी १९८५ साली बालकलाकार म्हणून 'सोने की चिडीया', 'लाजवंती' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. १९६९ साली 'सतीचे वाण' या चित्रपटात सहनायिका म्हणून तसेच 'दाम करी काम' या चित्रपटात मुख्य नायिका साकारली. अभिनयाच्या जोडीने चित्रपट, पटकथाकार, निर्मिती, दिग्दर्शन आणि वितरण, अशा विविध भागात आपल्या कर्तृत्वाचा विलक्षण ठसा त्यांनी उमटवला आहे. १९७७ मध्ये 'भिंगरी' या चित्रपटाची निर्मिती केली.

भरत जाधव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९८५ मध्ये शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'महाराष्ट्राची लोकधारा' मधून केली. तसेच, 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदर पंत', 'ऑल द बेस्ट' आणि 'आमच्यासारखे आम्हीच', या नाटकांतूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'गलगले निघाले', 'साडे माडे तीन', 'मुंबईचा डबेवाला', 'पछाडलेला', 'जत्रा', 'खबरदार', यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याचबरोबर १९९९ मध्ये 'वास्तव -द रियालिटी' या हिंदी चित्रपटात भूमिका केली आहे.

भरत जाधव यांचे 'सही रे सही' या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद 'गिनीज बुक' मध्ये झाली होती. याचप्रमाणे 'सही रे सही' या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराती भाषांतर झाले. या गुजराथी नाटकात शर्मन जोशी यांनी काम केले होते. त्या गुजराथी नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. याच नाटकाचे हिंदीत ही भाषांतर झाले. यामध्ये जावेद जाफरी यानी काम केले.

वामन भोसले़ यांचे बालपण गोव्यातील पामबुरपा या छोटया गावात गेले. तिथेच शिक्षण घेऊन १९५२ मध्ये ते मुंबईमध्ये आले. बॉम्बे टॉकीज या त्या काळातील एका प्रतिष्ठित चित्रपट निर्मिती संस्थेत संकलक डी.एन.पै यांच्याकडे आपण उमेदवारी सुरु केली. नवीन गोष्टी शिकण्याच्या स्वभावानुसार त्यांची ओळख गुरुदास शिराली यांच्याशी झाली. १९६९ मध्ये दिग्दर्शक राज खोसला यांनी राजेश खन्ना व मुमताज यांची भूमिका असलेल्या 'दो रास्ते' या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सोपवली व त्यांनी या चित्रपटाला उत्तम न्याय दिला. वामन भोसले यांना १९७८ साली 'इन्कार' या चित्रपटासाठी आपणास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 'बिमल रॉय ट्रॉफी', 'मामी' चित्रपट महोत्सवामध्ये सन २००३ साली सन्मानित करण्यात आले.

परेश रावल यांचे बालपण विलेपार्ले येथील आहे. ते दहा -अकरा वर्षाचे असताना कुतूहल म्हणून नवीनभाई ठक्कर ओपन थिएटर मध्ये जाऊ लागले. तेथूनच त्यांना गुजराती नाटकाची आवड लागली. रावल यांनी चित्रपट, रंगभूमी व दूरदर्शन या तीनही माध्यमातून भूमिका साकारली आहे. 'हेरा फेरी' चित्रपटातील त्यांची 'बाबू भाई'ची भूमिका प्रचंड गाजली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details