मुंबई -'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन 'अनन्या' आता रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित "अनन्या" हा चित्रपट नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.
ड्रीमविव्हर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
हेही वाचा -'अग्गबाई सासुबाई' मालिकेतील 'हा' कलाकार साकारणार 'शहीद भाई कोतवाल' यांची भूमिका
मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर 'अनन्या' ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे. रवी जाधव यांनी देखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 'या नव्या दशकाच्या शुभेच्छांबरोबर 'अनन्या' देणार अशक्य ते शक्य करण्याचा एक नवा आत्मविश्वास!!! कारण... शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!", असे कॅप्शन त्यांनी या फोटोवर दिले आहे.
चित्रपटाचं टीजर पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशयसंपन्न कथानक या चित्रपटातून मांडलं जाणार असल्यानं हा चित्रपट नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही.
हेही वाचा -खरी 'पूर्वी' शोधण्यासाठी चिन्मयने लावली अनोखी शक्कल, 'मेकअप'च नवीन पोस्टर लाँच