मुंबई - अभिनेता जितेंद्र जोशी लवकरच 'चोरीचा मामला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. या चित्रपटात तो चोराच्या भूमिकेत दिसणार असल्याचा अंदाज टीझरवरून येत आहे. तर, त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तिचे देखील पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
अमृताने आजवर बऱ्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'चोरीचा मामला' या चित्रपटात ती 'श्रद्धा'च्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका विनोदी तसेच ग्लॅमरस असणार आहे.
हेही वाचा -‘तुझ्यात जीव रंगला’मधला 'सन्नी दा' अडकला लग्नाच्या बेडीत
काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'नंदन' या व्यक्तिरेखेतील जितेंद्र जोशीचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता अमृताचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हातात पिस्तुल असलेली ग्लॅमरस अमृता या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे पिस्तुल आणि 'चोरीला मामला' यातील संबंध चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
हेही वाचा -‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
'मस्का' या चित्रपटानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून 'चोरीचा मामला' हा दुसरा चित्रपट आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओज निर्मित सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शननेच चित्रपटाचे लेखन तर, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -रणबीर आणि श्रद्धाची जमणार जोडी, आगामी चित्रपटात साकारणार भूमिका