मुंबई - हिंदी सिनेसृष्टीत ७० च्या दशकातील काळ हा सुवर्णकाळ मानला जातो. हा एक असा काळ होता, ज्यामध्ये चित्रपटाच्या पटकथेपासून ते गाण्यांची तुफान क्रेझ प्रेक्षकांवर पाहायला मिळायची. अभिनेता हा फक्त मारधाड करणारा, अभिनेत्रीसोबत रोमान्स करणारा, अशीच प्रतिमा तेव्हा 'हिरो'ची बनली होती. मात्र, अशा काळातही फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेते अमोल पालेकर यांनी आपली स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. साधारण चेहरा, आवाजात असलेली मधुरता आणि स्वभावात असेलली शालीनता या गुणांमुळे अमोल पालेकर हे लोकप्रिय अभिनेते बनले होते. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात या काही खास गोष्टी....
अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ साली मुंबईमध्ये झाला होता. त्यांनी आजवर दिग्दर्शक म्हणून बऱ्याच चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये 'कच्ची धुप', 'दायरा', 'नकाब' आणि 'पहेली' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
हिंदीसोबतच त्यांनी बंगाली, कन्नडा, मल्याळम यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अमोल यांची कारकिर्द तशी दिड दशकापेक्षा जास्त होती. मात्र, त्यांना केवळ एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. १९८० साली त्यांच्या 'गोलमाल' चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
अमोल पालेकर यांचे वडिल पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करत होते. तर, त्यांची आई ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत होत्या. अतिशय सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. मात्र, पडद्यावर त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलं. 'रजनीगंधा', 'घरौंदा', 'गोलमाल', 'छोटी सी बात' हे चित्रपट त्यांच्या करिअरमधले सर्वोत्कृष्ट चित्रपट बनले.