पणजी - 'ईफ्फी' महोत्सवाचं यंदा ५० वे वर्ष आहे. गोव्यात या महोत्सवाचं दिमाखदार उद्घाटन झालं आहे. या उद्घाटन प्रसंगी महानायक अमिताभ बच्चन यांची खास उपस्थिती होती. ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बिग बींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.'देशाला एकत्रित आणणाऱ्या काही मोजक्या माध्यमांपैकी चित्रपट असे माध्यम आहे, जे रंग, जात, धर्म बाजूला ठेवत लोकांना एकत्रित आणते. नव्या कलाकृती आणि निर्मिती स्वीकारून पुढे जाण्याचा संदेश देते, असे मत महानायक अमिताभ बच्चन यांनी यावेळी व्यक्त केले. चित्रपट कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर ईफ्फी आयोजक आणि गोवा सरकार यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह देऊन बच्चन यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.
चित्रपट सामाजिक जिवनात खुप प्रभावी भूमिका निभावत असतात, असे सांगून बच्चन म्हणाले, चित्रपट समाज आणि देशाला एकत्रित जोडत एकतेची भावना निर्माण करणाऱ्या माध्यमांपैकी एक आहे. कारण चित्रपट गृहातील अंधारात आपल्या समोर कोणत्या जात, धर्माची व्यक्ती बसली आहे हे पाहत नाही. बदलत्या जगात अशी मोजकीच माध्यमे शिल्लक आहेत. रंग, जात, धर्म बाजूला ठेवत नवनिर्मिती आणि कलाकृती स्वीकारत हातात हात घालून पुढे जाण्याचा संदेश हे माध्यम देत असते', अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
ईफ्फीच्या या सुवर्णमहोत्सवात बिग बींच्या काही खास चित्रपटाचं स्क्रिनिंग होणार आहे. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि आर. बाल्की दिग्दर्शित 'पा' या चित्रपट प्रदर्शनाने सुरुवात होणार असल्याने त्यांनी आपल्याला हा चित्रपट का करावासा वाटला आणि ' प्रोजेरिया' हा आजार काय आहे याची माहिती दिली.