मुंबई - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा बॉलिवूड जगतातून निषेध होत असताना अमिताभ बच्चन यांनी केवळ हात जोडलेला इमोजी ट्विट केला आहे. बिग बी यांच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही अनेक नेटकरी करत आहेत.
रात्रीच्या अंधारात चेहरा लपवून हातात काठ्या आणि रॉड घेऊन जेएनयू विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करण्यात आला. यात असंख्य विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी एक ट्विट केले. त्यांच्या ट्विट क्रमांक ३६०२ मध्ये त्यांनी केवळ हात जोडलेला इमोजी ट्विट केलाय. त्यांच्या या ट्विटवर रिट्विट करीत अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
एका युजरने म्हटलंय की, 'मैं आज भी फेंके हुये पैसे नहीं उठाता बोलनेवाला दिवार का विजय आज असल जिंदगी में पूरा पराजय हो चुका है.'
फक्त बाबूंजींची 'अग्नीपथ' कविता वाचण्याने कोणी साहसी होत नाही, अशी बोचरी टीकाही युजरने केली आहे.
दुसरा एक युजर गौरव राणाने म्हटलंय, की दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सरकारने तुमचे तोंड बंद केलंय. इतकी गुंडागर्दी पाहूनही रक्त उसळत नसेल तर ते रक्त नाही पाणी आहे.