हैदराबाद - दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने गेल्या वर्षीची सांगता ब्लॉकबस्टर पुष्पा या चित्रपटाने केली होती. या चित्रपटाने ३०० कोटीहून अधिक कमाई केली. त्याच्या हिंदी वर्जनलाही बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता २०२२ ची सुरुवातही तो आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटाने करणार अशीच तयारी सुरू झाली आहे.
त्याचे चित्रपट बऱ्याचदा तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या दक्षिण भारतीय भाषात रिलीज होत असतात. त्याच्या पुष्पा या चित्रपटाला हिंदी भाषेतील प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने त्याचे हिंदी भाषेतील फॉलोअर्सही वाढले आहेत. हे चाहते पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करीत होते. मात्र त्यासाठी अजून ११ महिने थांबावे लागणार होते. मात्र अशाचत त्याचा आणखी एक चित्रपट 'अला वैकुंठपुररामूलू' 26 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपटही हिंदी भाषेत रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे त्याच्या हिंदी भाषेतील चाहत्यांसाठी ही खूशखबरी आहे असे मानायला हरकत नाही.