मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगूबाई काठेवाडी' चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या नावाची घोषणा केल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी याच्या मोशन पोस्टरची झलक पाहायला मिळाली होती. आता आलियाचा लूक असलेले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
आलिया भट्टने 'गंगूबाई काठेवाडी' चित्रपटाचे हे नवे पोस्टर शेअर केले आहे.
पहिल्या पोस्टरमध्ये तरुणपणीची गंगूबाई दिसत आहे. निळा ब्लाऊज आणि लाल स्कर्टमध्ये आलिया निडर अंदाजात दिसत आहे. बाजूच्या टेबलवर पिस्तूल दिसत आहे.
दुसऱ्या पोस्टरमध्ये आलिया माफिया क्विनच्या करारी लूकमध्ये दिसत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरमध्ये आलियाने लाल रंगाची बिंदी लावलेली आहे. तिचा लूक खूप दमदार दिसत आहे.
'गंगूबाई काठेवाडी' हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्विन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. यात आलिया क्विनची भूमिका साकारत आहे. खूप कमी वयात वेशा व्यवसायात ढकलले गेल्याच्या व्यक्तीची भूमिका ती साकारत आहे.
गंगूबाई कामाठीपूरा येथे कोठा चालवत असे. तिने देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी खूप काम केले. गंगूबाईचे पूर्ण नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते.
संजय लीला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठेवाडी' हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० ला रिलीज होणार आहे.