मुंबई - ९० च्या दशकातील अक्षय कुमार आणि रविना टंडनवर चित्रीत झालेले 'टीप टीप बरसा पाणी" गाणे अजूनही लोकांच्या चांगलेच स्मरणात आहे. यातील पिवळ्या साडीत भिजलेली रविना अनेकांच्या डोळ्यासमोर अजूनही तरंगते. आजही मोहरा चित्रपटातील हे गाणे अनेकांच्या आवडीचे आहे.
अक्षय कुमारने हे गाणे आपल्या आगामी चित्रपटासाठी रिक्रिएट करणार असल्याचे ट्विटरवरुन घोषित केले. आगामी सुर्यवंशी चित्रपटात हे गाणे अक्षय आणि कॅटरिना कैफ यांच्यावर चित्रीत केले जाणार आहे. अक्षयच्या चाहत्यांनी यावर आक्षेप घेत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या गाण्याचे श्रेय रविनाला न दिल्याबद्दल तो ट्रोल होत आहे.
''अक्की, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. परंतु तू या गाण्याचे श्रेय रविनाला द्यायला विसरलास हे आवडले नाही. मी जरी रविनाचा फॅन नसलो तरी कॅटरिनाने आजवर जे केलंय ते पाहता ती रविनासारखे करु शकणार नाही..,'' असे एका चाहत्यांने म्हटले आहे.