मुंबई -बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची सध्या मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेतही वाढ होत आहे. यावर्षी 'केसरी' आणि 'मिशन मंगल' यांसारखे सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले आहेत. तर, आगामी बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये त्याची वर्णी लागली आहे. याशिवाय आता तो एका म्यूझिक व्हिडिओतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
अक्षय कुमार हा 'फिलहाल' या म्यूझिक अल्बममध्ये अभिनेत्री नुपूर सेनॉन आणि एमी विर्क यांच्यासोबत झळकणार आहे. अरविंदर खैरा हे या गाण्याचे दिग्दर्शन करत आहेत. तर, 'बी पार्क' याचा आवाज या गाण्याला लाभणार आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या म्यूझिक व्हिडिओतील कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
अक्षय कुमारचे पुढच्या वर्षीदेखील दिवाळी, ख्रिसमस आणि ईद या तिनही मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये 'पृथ्वीराज', 'लक्ष्मी बाँब', 'बच्चन पांडे', यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.