मुंबई -सुप्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांची वर्णी लागली आहे. 'अतरंगी रे' असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या तिघांचे फर्स्ट लुकदेखील प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुष हे पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. एका माध्यमाशी बोलताना अक्षयने सांगितले, की या चित्रपटाची कथा त्याला इतकी आवडली की त्याने अवघ्या १० मिनिटांमध्येच या चित्रपटासाठी होकार कळवला होता. या चित्रपटातील भूमिका आव्हानात्मक असल्याचेही त्याने सांगितले. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच माझे पात्र असल्यामुळे या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले.