मुंबई -बॉलिवूडमध्ये 'खिलाडी' आणि आता 'हिट मशिन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारचं बॉलिवूडमध्ये एक प्रस्थ निर्माण झालं आहे. सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान या तिनही खानांना मागे टाकत अक्षयने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे एकापाठोपाठ एक सलग सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी १०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. जगातील सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या अभिनेत्यांमध्येही अक्षयच्या नावाचा समावेश आहे. मात्र, एकेकाळी त्यालाही फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला होता. अलिकडेच एका माध्यमाच्या मुलाखतीत त्याने याविषयी उलगडा केला आहे.
अक्षयचा सुरुवातीचा काळ खूप स्ट्रगलिंग होता, हे सर्वांना माहितच आहे. त्याला 'खिलाडी' चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती. तेव्हापासूनच तो 'खिलाडी' या नावाने ओळखला जातो. त्यानंतर त्याने बॅक टू बॅक बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र, त्याच्या काही चित्रपटांना अपयश मिळाले.
त्याचे तब्बल १४ चित्रपट फ्लॉप ठरले होते. तेव्हा आपलं करिअर आता संपलं, असं अक्षयला वाटलं होतं. मात्र, 'ते माझं एकप्रकारे प्रशिक्षणच होतं. त्या चित्रपटातूनही मला बरंच काही शिकायला मिळालं. कदाचित त्या चित्रपटातील चुकांमुळेच मला पुढे शिकण्याची संधी मिळाली. त्यांनी मला एकप्रकारची शिस्त शिकवली, म्हणूनच आज मी सर्वोत्कृष्ट चित्रपट देऊ शकतो', असं अक्षयनं सांगितलं आहे.
हेही वाचा -जॉन अब्राहम 'सत्यमेव जयते'च्या सिक्वेलसाठी सज्ज, फर्स्ट पोस्टर प्रदर्शित