मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अभिनयासोबतच सामाजिक कार्यात सक्रिय असतो. त्याने तृतीयपंथीयांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. चेन्नई येथे तृतीयपंथीयांना घरे बांधून देण्यासाठी अक्षयने दीड कोटी रुपयांची मदत केली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक लॉरेन्स राघवनने याबाबत माहिती दिली आहे.
अक्षय कुमार लॉरेन्स राघवनच्या आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो तृतीयपंथीयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. लॉरेन्स राघवनने अक्षय कुमारचा तृतीयपंथीयांसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर करुन त्याने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे.
हेही वाचा -ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी 'सूर्यवंशी'चं मोशन पोस्टर रिलीज, पाहा खिलाडीचा दमदार लुक
'तुम्हाला ही आनंदाची बातमी सांगताना आनंद होत आहे. भारतात पहिल्यांदा अक्षय कुमारने तृतीयपंथीयांना घरे बांधून देण्यासाठी १.५ कोटीची मदत केली आहे. लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्टद्वारे त्याने ही मदत केली आहे', अशी माहिती लॉरेन्सने दिली आहे.
'लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्टचे यंदा १५ वे वर्ष आहे. यावर्षी तृतीयपंथीयांसाठी घरे बांधून देऊन हे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. लॉरेन्स ट्रस्टद्वारे जमीन पुरवण्यात आली आहे. तर, घरे बांधून देण्यासाठी फंड जमा करण्याच्या प्रयत्नात असताना अक्षयने 'लक्ष्मी बॉम्ब'च्या शूटिंगदरम्यान तो स्वत: या कामासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याने आपले आश्वासन पूर्ण करत १.५ कोटीची मदत केली आहे', असेही लॉरेन्स यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा -'सूर्यवंशी'ची उत्कंठा शिगेला, तब्बल ४ मिनिटांचा असणार ट्रेलर
मागच्या वर्षी मे महिन्यात अक्षय कुमारने 'लक्ष्मी बॉम्ब'चे पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. हा चित्रपट तमिळ हॉरर असलेल्या 'मुनी २ - कंचना'चा हिंदी रिमेक आहे. अक्षय कुमार, कियारा आडवाणीसोबतच शरद केळकर, अश्विनी कळसेकर आणि तरुण अरोरा यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. राघव लॉरेन्स यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २२ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.