मुंबई -भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे बॅनर्जी हे सदस्य होते. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते. बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या खास भेटीची एक आठवण शेअर केली आहे.
अजयने त्याच्या 'मैदान' शूटिंगच्या दरम्यान आपल्या टीमसह प्रदीप कुमार बॅनर्जी यांची भेट घेतली होती. 'मैदान' हा चित्रपटही फुटबॉलवर आधारित असल्याने त्यांची ही भेट खास ठरली होती. अजयने त्यांच्याकडून फुटबॉलचे काही धडे देखील घेतले होते. त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन त्याने लिहिले आहे, की 'कोलकाता येथे 'मैदान'च्या शूटिंगदरम्यान प्रदीप कुमार बॅनर्जी यांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अत्यंत दु:ख होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो'.