मुंबई- प्रवीण तरडे यांचं दिग्दर्शन आणि भूमिका असलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता प्रवीण तरडे आणखी एक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सर सेनापती हंबीरराव असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे.
चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करत याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. ‘तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ', अशा ओळी या पोस्टरवर लिहिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे सर सेनापती असणारे हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा आणि त्यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.
प्रवीण तरडे यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोरा हे करणार आहेत. दरम्यान चित्रपटात हंबीररावांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला हा चित्रपट २०२०च्या जानेवारीत प्रदर्शित होणार आहे.
कोण आहेत हंबीरराव मोहिते -
हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे एक सैन्यप्रमुख होते. शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या बहिण होत्या. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ते शंभूराजेंच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली.