मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अनेकजण व्यक्त होत असतात. मनोरंजनसृष्टीतील अनेक महिला कलाकारांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत. 'डॉक्टर डॉन' मालिकेत डॉ. मोनिका साकारणारी श्वेता शिंदे हिच्यासाठी महिला दिवस रोजच आहे. तिच्यासाठी तिची आई तिचं इन्स्पिरेशन आहे.
अभिनेत्री श्वेता शिंदे
श्वेता म्हणाली, 'माझ्या आईला बघून मला काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा सतत मिळत असते. महिला संसाराची गाडी अगदी हसतमुखाने पुढे नेत असतात त्यामुळे रोजचा दिवस हा त्यांचाच असतो असं मी म्हणेन. डॉक्टर डॉन या मालिकेत मी डॉक्टर आणि कॉलेजच्या डीनची भूमिका निभावतेय. मला पडद्यावर तरी ही भूमिका साकारायला मिळतेय हे मी माझे भाग्य समजते.
आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कुठल्या राक्षसाशी मुकाबला करीत आहेत. ते किती आव्हानात्मक आहे हे आपण कोव्हिडच्या काळात बघितलं आणि अजूनही बघतोय. डॉक्टरांचं योगदान किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. ते डॉक्टर नसून देव म्हणूनच सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले. कोवीड-वॉरियर्स मध्ये अनेक महिला डॉक्टर्स आणि परिचारिका आहेत व त्यांचे आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि एकूणच त्या सर्वांकडूनच मला खूप प्रेरणा मिळाली. ते आपलं घरदार विसरून रुग्णांच्या सेवेत अजूनही तत्पर आहेत. मी ऑन-स्क्रीन का होईना एका डॉक्टरची भूमिका निभावतेय याचा मला आनंद आहे. सगळ्या महिलांना माझ्या कडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.’
अभिनेत्री प्रतिक्षा जाधव
अभिनेत्री प्रतिक्षा जाधव हिने नुकतीच ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत अपूर्व नेमळेकरची रिप्लेसमेंट केलीय. महिला दिनानिमित्त ती म्हणते की, ‘स्त्रीत्व इतकं महान आहे कि ते साजरं करण्यासाठी फक्त एक दिवस असणं हे खूप केविलवाणं आहे. मी ज्युडो व कराटेचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे महिला दिनानिमित्त मी आजूबाजूच्या शाळांमधल्या मुलींना एकत्र करून त्यांच्यात आत्मविश्वास जागृती आणि आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करते. माझी सगळ्यात मोठी ताकत माझी आई आहे. तिच्याकडूनच मला निडरपणा आणि आत्मविश्वास शिकायला मिळाला आहे. मी तेजस्विनी नामक एक महिला बचत गट सुरु केलेला आहे. त्यांच्यासाठी आम्ही महिला दिनानिमित्त काही चर्चासत्रे ठेवतो जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल किंवा त्यांना त्यांच्या समस्यांना कसं सामोरं जावं याचे ज्ञान मिळेल. स्त्रीने प्रत्येक दिवस हा महिला दिन समजूनच साजरा करावा. स्त्रीचा आणि स्त्रीत्वाचा आदर करणं जेव्हा सगळ्यांना जमेल तोच दिवस खरा सोन्याचा दिवस असेल आणि खऱ्या अर्थाने महिला दिवस असेल. मी सध्या ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत पम्मीची भूमिका साकारतेय. या मालिकेसाठी आम्ही नगरमध्ये शूट करतोय. कधी कधी पॅकअप उशिरा झालं की आम्हाला घरी जायला उशीर होतो. मी स्वतः ड्राइव्ह करून जाते. अशावेळी मला माझा निडरपणा कामी येतो. महिलांमध्ये खूप शक्ती आहे फक्त त्यांनी स्वतःची ताकद ओळखली पाहिजे. स्त्रीचा आणि स्त्रीत्वाचा आदर करणं जेव्हा सगळ्यांना जमेल तोच दिवस खरा सोन्याचा दिवस असेल आणि खऱ्या अर्थाने महिला दिवस असेल. सगळ्या महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.’
अभिनेत्री प्रिया मराठे
झी युवा च्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मधील प्रिया मराठे हिच्या मते स्त्रीचं स्त्रीत्व साजरं करण्यासाठी एकच दिवस पुरेसा आहे असं तिला नाही वाटत. ती पुढे म्हणाली, ‘स्त्रियांनी त्यांचं स्त्रीत्व जपलं पाहिजे, ते रोज साजरं केलं पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत. अगदी देशाचं वित्त सांभाळण्यापासून ते सीमेवर लढण्यापर्यंत आणि घरातील सर्व कामं करण्यापर्यंत स्त्रिया प्रत्येक ठिकाणी आपलं कौशल्य दाखवत आहेत. माझ्या स्वतःबद्दल सांगायचं झालं तर माझी निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली आहे. एखाद्या परिस्थितीत मी पटकन प्रतिक्रिया न देता संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रतिक्रिया देते. माझे पती आणि माझं कुटुंब हि माझी सगळ्यात मोठी ताकद आहे.
स्त्री ही अनंतकाळची माता असते असे समजले जाते. आई ही पुढच्या पिढीला घडवत असते, त्यांना संस्कार देत असते, उत्तम माणूस कसं बनता येईल याची शिकवण देत असते त्यामुळे आई असणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत एका आईची भूमिका साकारतेय. प्रत्येकासाठी आई ही आयुष्यातील सर्वात महत्वाची स्त्री असते. तिची भूमिका अजिबातच सोपी नसते. सगळ्या आई ही भूमिका उत्तम प्रकारे साकारत आहेत त्यामुळे त्यांना मी त्रिवार अभिवादन करेन. सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.’
हेही वाचा - सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने मिळवला 'हा' सन्मान