मुंबई -'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ती चित्रपटांपासून दूर होती. मात्र, आता दाक्षिणात्य अभिनेता प्रभाससोबत ती एका आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भाग्यश्रीने आपल्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. मात्र, एका गोष्टीमुळे आजही आपल्याला भीती वाटत असल्याचे तिने सांगितले आहे.
भाग्यश्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती तिच्या पतीसोबतची एक आठवण शेअर करताना दिसते. भाग्यश्रीने १९९० साली तिचा बालपणीचा मित्र हिमालय दस्सानीसोबत लग्नगाठ बांधली होती. शालेय जीवनापासून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. पुढे त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा -बॉलिवूडचा 'हा' अभिनेता आहे बिग बींचा 'फेवरेट', शेअर केला जुना फोटो
त्यांच्या लग्नाला भाग्यश्रीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, हिमालयपासून तब्बल दीड वर्ष वेगळं राहिल्यानंतर त्यांच्या लग्नाला परवानगी मिळाली. 'जर हिमालय माझ्या आयुष्यात मला भेटले नसते आणि माझं दुसऱ्या कोणाशी लग्न झालं असतं तर... ती अशी वेळ होती जेव्हा मला त्यांच्यापासून दीड वर्ष वेगळं राहावं लागलं. या गोष्टीची आताही आठवण झाली तर भीती वाटते', अशा शब्दांमध्ये भाग्यश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाग्यश्री आणि हिमालय यांचा मुलगा अभिमन्यू दस्सानीनेही आता चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली आहे. त्याने 'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटात राधिका मदानसोबत भूमिका साकारली होती. आता तो शिल्पा शेट्टीसोबत 'निक्कमा' चित्रपटात भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा -प्रभाससोबत सिनेमा करतीय भाग्यश्री, 'सरप्राईज पॅकेज' असल्याचा केला खुलासा
दुसरीकडे भाग्यश्रीच्या हातातही आता तीन चित्रपट आहेत. 'किटी पार्टी', 2 स्टेट्सचा तेलुगू रिमेक आणि प्रभासच्या आगामी चित्रपटात ती काम करणार आहे. भाग्यश्री म्हणाली, ''प्रभासचा २० वा चित्रपट एक सरप्राईज पॅकेज आहे. प्रत्येक चित्रपटात एक नवीन भाग्यश्री पाहायला मिळेल. कारण वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारायला मला आवडते.''